Translate

Wednesday, December 7, 2016

ब्युटि प्लांट्स -कोरफड


                                       कोरफड :-एक औषधी वनस्पती 

      कोरफड ही वनस्पती भारतात सर्व ठिकाणी आढळते .शेतांच्या कुंपणावर किंवा इतरेतर ही आढळतेच ,पण घराच्या अंगणात किंवा कुंडीत देखील ही शोभेसाठी तसेच एक उपयोगी वनस्पती म्हणून मुद्दाम लावली जाते.
   कोरफडीची ऊंची साधारणत: ३० ते ३५ सें.मी. असते .हिला खोड नसते. बुंध्यापासूनच पात्या फुटतात. पात्या मनगटाएवढ्या जाड असून त्यात बुळबुळीत गर भरलेला असतो .हा गर अत्यंत कडू असतो .पात्यांना छोटे छोटे काटे असतात. हिवाळ्यात पूर्ण वाढ झालेल्या कोरफडीला लांब दांडा फुटतो व त्याला नारंगी किंवा लाल फुले येतात . पात्यातील गर थंड झाल्यावर घट्ट होतो व त्याला कुमारी सार म्हणतात . त्यापासूनच कुमारी आसव  हे उपयुक्त औषध तयार करतात.
      कोरफडीचे scientific नाव Aloe vera burm असे असून  संस्कृत मध्ये हिला धृतकुमारिका असे नाव आहे,
इंग्रजीत इंडियन अलो तर हिंदीत धी कुंवार किंवा ग्वारपाठा असे म्हणतात .
रासायनिक गुणधर्म :-
 कोरफडीच्या संपूर्ण झाडाचा म्हणजे पंचांगाचा उपयोग केला जातो. कोरफडीत aloen glucoside नावाचे द्रव सापडते .याशिवाय  यापासून सुगंधित तेल पण प्राप्त होते.
कोरफड ही शितलकडू, मधुर, अग्निदीपक , पुष्टीकारक असून प्लीहा,यकृतदोष,ताप,त्वचादोष,रक्तविकार,व्रण, व केसांवर अत्यंत गुणकारी आहे.

उपयोग :- अनेक व्याधींवर गुणकारी  अशा कोरफडीच्या काही घरगुती औषधांचा व उपायांचा परिचय करून घेऊ या 

१) पाचक व अग्निवर्धक -अपचन, भूक न लागणे
   कोरफडीची पाती गरम करून, फडक्यात पिळून त्याचा २ चमचे रस ,तितक्याच मधाबरोबर २ वेळा घ्यावे .       अपचनाचा त्रास कमी होऊन भूक लागते .
२) डोळे व हातपायांची आग -
 यासाठी कोरफडीची पात ठेचून २ चमचे रस काढावा व थोडी खडीसाखर घालून    खावे आग थांबते.
३) श्वास लागणे व कफहारक- 
  विशेषत :लहान मुलांना कोरफडीचा रस,सैंधव मीठ घालून द्यावा .याने परसाकडे साफ होऊन कफ बाहेर पडतो. तसेच दम लागत असल्यास कोरफडीचा रस व मध सम प्रमाणात घेतल्यास त्रास कमी होतो. 
४) भाजण्यावर -
कोरफडीचे पान नीट सोलून आतील गर भाजलेल्या जागी लावावा .गार वाटते व दाह कमी होतो.
५) बारीक तापावर-
दिवसातून ३ वेळा कोरफडीचा रस ५ ग्रॅम,काळ्या मिर्‍याची पूड ५ ग्रॅम मध किंवा साखरेबरोबर घ्यावी.
६) कुमारी आसव - 
कोरफडीच्या गरापासून कुमारी आसव तयार करतात . विशेषत : स्रियांना बाळंतपणानंतर याचा खूप उपयोग होतो .
७) जखम भरून येणे व फोडांवर-
फोड जर पिकत नसेल तर कोरफडीचा गर  गरम करून फोडांवर  बांधला तर फोड लवकर पिकतो ,
ठणका कमी होतो व फोडाचा व्रण भरून येण्यास गरात थोडी हळदीची पावडर मिसळून लावल्यास जखम लवकर भरून येते .रेडिएशनमुळे झालेले असाध्य व्रण सुदधा कोरफडीमुळे बरे होतात हे सिद्ध झाले आहे.
८) केसांसाठी -
जिला लाल रंगाची फुले येतात त्या कोरफडीचा गर केसांना लावल्यास केस पांढरे होत नाही व गळतही नाही.
टक्कल पडत असल्यास कोरफडीच्या उपयोगाने गेलेले केस परत येतात.
९) यकृत किंवा प्लीहा वाढीवर -
यासाठी कोरफडीचा रस १० ग्रॅम  व नवसागर २ ग्रॅम टाकून रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा.
१०) जोडधंदा म्हणून -
आजकाल आधुनिक प्रसाधने, उदा .श्यांपू ,क्रीम,बॉडी लोशन इ.मध्ये कोरफडीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कोरफडीला व्यापारी दृष्ट्या पण महत्त्व प्राप्त झालेले आहे. शेतकर्‍यांनी कमी खर्चाचा जोडधंदा म्हणून कोरफडीची लागवड करणे उपयुक्त आहे.


No comments:

Post a Comment